भूत

नसलेल्या भुताची, असलेली भीती

आपल्या बाल जीवनातील सर्वाधिक भाग व्यापलेला असतो तो भूताच्या भीतीने, असे फार कमी बालक असतील ज्यांनी भूत, चुडेल,मुंजा, लावडीन या विषयी माहित नसेल. आम्ही शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेतो तेव्हा मुलांना विचारतो तुम्ही भूताविषयी ऐकलेले आहे का? छोटी मुलं एकदम डोळे विस्फारतात, कुणाच्या चेहऱ्यावर अनमिक भीती तर कुणाच्या चेहऱ्यावर आम्हाला बरच काही माहित असलेल्या प्रांता विषयी विचारल्याचा आनंद असतो आणि मग विद्यार्थी भूताविषयी भरभरून बोलू लागतात. त्यांच्या म्हणण्या नुसार भूत पांढऱ्या रंगाचे असते, रात्री बारा वाजता निघते, भूताचे पाय उलटे असतात, ते चिंच , पिंपळाच्या झाडावर असते, भूत चामड्याच्या चपलेला व आगीला घाबरते, भूत  माणसाच्या अंगात येतात, भूत माणसाला झपाटते वैगरे वैगरे.  मग आम्ही त्यांना मध्येच थांबून विचारतो तुम्ही प्रत्यक्षात भूत पहिले आहे का?  कुणी Hi! mr. Bhut how are you? असे म्हटले आहे का? असा प्रश्न विचारताच मुलांचे चेहरे गोरेमोरे होतात ते एकमेकांकडे बघतात आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं रहाते मग आम्ही म्हणतो तुम्ही जर कधीच भुताला पहिले नाही, कुणीच त्याचा आज पर्यंत फोटो घेतला नाही तर मग तुम्ही भूत मानता कसे. तुम्हाला त्याच्या विषयी कुणी सांगितले तर म्हणतात आजी, मामा, काका, आई, बाबा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टी. व्ही. टेलीव्हिजन वर तर भुताच्या अनेक सिरिअल्स मुलं बघतात  आता तर Annabelle डॉलनेही मुलांमध्ये भीती पसरवली आहे. मित्रांनो मुलं जे ऐकतात, बघतात ते त्यांच्या संस्कार क्षम मनावर खोलवर बिंबवले जाते. मुले कुठे एकटी गेली की त्यांच्या मनावर भूताची भीती कायम असते. पुढे मुलांच्या मोठे होण्या बरोबरच भूताची भीतीही मोठी होत जाते.

माणूस मेल्या नंतर अतृप्त आत्मा भटकतो व कुणाच्याही शरीरात प्रवेश करून आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो अशी कल्पना आहे, खरे तर  लहानपणापासून भूत असण्याचे संस्कार झालेले असतात. भूत चिंचेच्या, पिंपळाच्या झाडावर असते, वेगळी भाषा बोलते, त्याच्यात प्रचंड ताकत असते वैगरे. माणूस मेल्यानंतर त्याचा अतृप्त आत्मा भटकत असतो व तो कुणालाही झपाटतो, कुठे तो मुंजा लावडीन तर कुठे चुडेल या नावाने ओळखल्या जातो,   परंतु मेडिकल सायन्स आत्मा मानत नाही. कारण मेडिकल सायन्सने आत्मा शोधला पण सापडला नाही ज्या गोष्टीचा पुरावा नाही ती गोष्ट विज्ञान मानत नाही, याचाच अर्थ या जगात भूत नसते भूत  माणसाच्या डोक्यात असते, खरे तर माणूस मेल्या नंतर सर्व ब्रेन तंतू नष्ट होतात, त्यामुळे आठवण, ओळख या गोष्टीच शिल्लक राहत नाही. तरी भूत झपाटते, अंगात येते कसे ते आता आपण पाहू , भूत तीन प्रकारे माणसाला लागते  एक म्हणजे सजेशन ने लागणारे भूत, दुसरे ढोंग यालाच  म्यालीगरिंग असे म्हणतात  व तिसरे गंभीर मानसिक आजार.

आपल्या देशात जेवढी भूत लागतात त्यापैकी दहा टक्के भूतं सूचनेने लागतात. भूत अंगात आल्यावर माणूस कसे बोलतो, तो वागतो कसा, त्याच्या कृती कश्या असतात हे आपण भरपूर एकलेलं असते. त्यामुळे पुढे कधी अंधारातून एकटे जात असतांना डोक्यातली भूताची भीती जागृत होते उदा. रात्री अंधारातून चिंचेच्या झाडाखालून तुम्ही जात आहात, बारा वाजलेले आहे आणि झाडाच्या मागून खट खट असा आवाज आला, तुम्हाला काहीतरी पांढरं झाडावर लटकलेले दिसले, की तुम्ही धूम ठोकून तेथून पळू लागता आणि दारात जाऊन धपकन पडता, शेजारी- पाजारी जमा होतात व म्हणतात हा रात्री बारा वाजता चिंचेच्या झाडा खालून आला, याला नक्की भूत लागलं असणार, तुम्ही अर्धवट तंद्रीच्या अवस्थेत असता अश्यावेळी तुमच अचेतन मन या सूचना स्वीकारते आणि मग तुम्ही भूत अंगात आल्यावर लोक जसे करतात तसे वागू लागता, हा केवळ मेंदूला दिलेल्या सूचनांचा परिणाम असतो. मग भूत लागले आहे असा समज झालेल्या माणसाला नंतर मांत्रिका कडे नेले जाते, तेथे मांत्रिक याला लागलेलं भूत खूप जहाल आहे असे सांगतो, मंत्र टाकतो, कडू लिंबाच्या फांदीने मारहाण करतो व नंतर तांब्यात ते पकडल्याचा दावाही करतो, भूत अंगातून निघाल्याच्या सूचना मेंदूला जातात व याचे खरच भूत उतरते. सूचनेद्वारा लागलेलं भूत सूचनेने उतरते. हा नॉर्मल होतो, हे झाले कसे तर मी आधीच म्हटल्या प्रमाणे हा देखील केवळ सूचनांचा परिणाम आहे परंतु यावेळी सकारात्मक सूचना. मग प्रश्न शिल्लक राहतो जर मांत्रिक भूत उतरवण्याचे चांगले काम करीत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला विरोध का करते, याचे उत्तर आहे की सूचनेने लागलेले भूत पुन्हा सुचने द्वारा लागू शकते आणि यामुळे मांत्रिकाचे मात्र अकारण महत्व वाढते, त्यामळे आधी माणसाच्या डोक्यातील भूत समूळ काढणे गरजेचे आहे म्हणजेच भूताची भीती नष्ट करणे आवश्यक आहे. खरंतर तुम्ही पाहिलेल भूत नव्हतच, कोणतीही शहानिशा तुम्ही न करता तुम्ही ते स्वीकारलं, तुम्हाला झाडाच्या मागून आलेला आवाज कदाचित एखाद्या प्राण्याच्या शिंग घासण्याचा असेल,व वर पाहिलेलं पांढरं कदाचित वावटळीने उडून झाडात अडकलेलं कापड असेल, किंवा आकाशही असेल, परंतु तुम्ही त्याची चिकित्सा केलीच कुठे? जर आपण मुलांना बालपणा पासून तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला शिकवले तर तो प्रत्तेक गोष्टीची चिकित्सा करेल, अत्मात्विश्वास बाळगेल व वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करेल. यानंतर त्याला भूत कधीच लागणार नाही. आत्मविश्वास, चिकित्सा, व वैज्ञानिक दृष्टीकोन ज्याच्याकडे असेल त्याला भूत कधीच झपाटणार नाही. प्रबोधनाने असे शक्य आहे. “या जगात भूत नसते ते माणसाच्या डोक्यात असते” ही गोष्ट अगदी खरी आहे.

दुसऱ्या प्रकारचे भूत म्हणजे म्यालिंगरिंग – ढोंग सदृश. या प्रकारामध्ये लोक कामातून सुटका करून घेण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी व अन्य कारणाने भूताचे सोंग करतात. या देशात ९० टक्के भूतं ही स्रियांना लागतात. त्यातील किमान ७० टक्के या म्यालिंगरिंग  या प्रकारात मोडतात. भारतात मुळातच स्रियांना दुय्यम स्थान आहे. अशिक्षितपणा पारंपारिक संस्कार मोकळ बोलण्याची मुभा नसल्याने होणारे भावनाचे दमन हे बऱ्याच कुटुंबातून बघायला मिळते. मुलींचे कमी वयात लग्न, बालपणापासून दुय्यम वागणूक, शिक्षणाची कमतरता व इच्छा आकांक्षाचे  दमन, घरातील करावयाला लागणारी भरपूर कामे यामुळे मनावर असह्य ताण निर्माण होतो यातून सुटका करवून घेण्यासाठी भूत अंगात आल्याचं ढोंग केल्या जाते. असे केल्याने  या स्रियांना घरात सहनुभूतीपुर्वक वागणूक मिळते, नेहमी दुर्लक्ष करणारे लोक हिच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागतात. अतीजास्त कामांमधून तत्पुती का होईना सुटका मिळते. या स्रियांकडे अ. भा. अनिस सहनुतीपूर्ण नजरेने बघते कारण कुटुंबाने व  समाजाने या स्रियांची अवस्था दैननीय केलेली असते. मग भूत अंगात येण्याच किंवा भुताने झपाटल्याच ढोंग करून तिला काही काळ तरी समस्येतून मुक्त झाल्या सारख वाटते. म्यालिंगरींग प्रकारात लागलेले भूत मंत्राने उतरत नाही, मांत्रिक मारहाण करतात (धाकाने कधी कधी उतरतात) पण सोडत नाही, अश्या स्रियांना मुलींना महिनो न महिने दर्ग्यावर ठाण्यांवर व मंदिरात तसेच चर्च मध्ये भूत उतरवण्याच्या बहाण्याने ठेवले जाते, तेथील मांत्रिक, पुजारी आणून सोडलेल्या स्रियांचं अनेकदा लैंगिक शोषण करतात, काही शारीरिक सुखाला मुकलेल्या स्त्रियांना कधी कधी ते बरेही वाटते परंतु ज्या स्रियांना नैतिकतेची कल्पना टोकाची असते त्या मात्र आत्महत्या करतात. आज भारतातील अनेक दर्गे, मठ, मंदिरे स्रीयांच्या लैंगिक शोषणाचे अड्डे झालेले आहे.

तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार,  बऱ्याचदा हिस्टेरिया, सिझोफ्रेनिया मॅनिया, डिप्रेशन, पॅरोनिया यासारखे मानसिक आजार माणसाला  जडलेले असतात परंतु या आजारांनी ग्रस्त व्यक्तीला भुताने झपाटल्याचे  सांगितले जाते. यांना मांत्रिकाकडे नेले जाते, मांत्रिक मारहाण करतो परंतु यांच्या अंगातील भूत निघत नाही, तो जिद्दीला पेटतो व अधिक मारहाण करतो, मिरचीची धुनी देणे, केसाला धरून आड्याला टांगणे, दोराने, काठीने व चाबकाने मारणे , पद्त्रानाचे पाणी पाजणे, शरीरावर डाग देणे यासारखे भयानक यातना देणारे उपचार हे मांत्रिक  करतात पण यश येत नाही कारण हे मानसिक आजार आहे हे त्यालाच माहित नसते, आपल्या समाजात या आजारांविषयी मुळीच जागरुकता नाही म्हणूनच गरोदर स्रिया, नवविवाहिता, अपार काबाडकष्ट करणाऱ्या परंतु दुलाक्षित स्रिया, लांगिक उपासमार व अत्याचार निमूट पणे सहन करणाऱ्या स्रिया, तरुण मुली मुले यांना वरील पैकी कोणत्याही प्रकारचा आजार झाला तरीही भूत लागल्याच सांगून अघोरी उपचार केले जातात. आपल्या देशात नैतिकतेच्या असलेल्या दुटप्पी कल्पना, स्रियांचे होणारे भावनांचे दमन, दुय्यम वागणूक, सततची बाळंतपण अशी किती तरी कारणांनी मानसिक आजार जडतात. अश्या वेळी  व्यक्ती काहीतरी बडबड करते, झोपेत चालते, संशयी बनते, विचित्र हावभाव करते, तिच्या हालचाली सामान्य राहत नाही. तिच्यात प्रचंड ताकद  आल्यासारखी वाटते, तीन चार व्याक्तीनही ती आवरत नाही अश्या बिकट प्रसंगी खरे तर तिला वैद्यकीय उपचाराची गरज असते परंतु भारतात या स्रियांना दर्गे, बुवा बाबांचे मठ, मंदिरे व चर्च याठिकाणी ठेवले जाते, महिनोन महिने या मुली व महिला तेथे राहतात व तेथील पुजारी मांत्रिक यांचे लांगिक शोषणाला बळी पडतात वा मृत्युमुखी पडतात.  मी अमरावती जिल्ह्यात असलेल्या सावंगा या ठिकाणी अनेक तरुण मुली व स्रियांना भर उन्हात सकाळदंडाने बांधून ठेवलेले बघितले.त्यांचे नातेवाईक त्यांना घरी न्यायला तयार नाही, वैद्यकीय मानसिक उपचार तर दूरच. माहूरचे दत्त मंदिर, गांगापूर,  सैलानीचा दर्गा महिमाचे चर्च ही महाराष्ट्रातील काही भूत उतरवण्याचे ठिकाण मानले जाते. या प्रकारात अनेक स्रियांचा बळी जातो ही वस्तूस्थिती आहे.  १९८२ साली बेबी सोमाणी नावाच्या मुलीने सैलानीच्या दर्ग्यावर आत्महत्या केली त्यानंतर तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली.

या जगात कोठेही भूत नसते मित्रांनो माणूस मेल्या नंतर काहीही शिल्लक राहत नाही म्हणूनच बुद्धीचा वापर करा,  भूतावर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा याच उच्चाटन करण्यासाठी “जादूटोणा विरोधी कायदा” अस्तित्वात आला आहे.
जादूटोणा वोरोधी कायदा अनुसूची  १. प्रमाणे –

भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुनी देणे, त्या व्यक्तीस चाटला टांगणे, त्याला दोराने किंवा केसांनी बंधने किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे,व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहचवणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्ती मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे कायद्याने गुन्हा ठरते. त्यास सहा महिने ते सात वर्ष कारावास व पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड होऊ शकतो. असे कृत्य करणारे मांत्रिक, त्याचे सहकारी, कृत्य घडलेली जागा ट्रस्टची असेल तर सारे ट्रस्टी व जागेचा मालक,  मांत्रिकाला न थांबवणारे पिडीत व्यक्तीचे नातेवाईक, जशीच्या तशी बातमी देणारे टी. व्ही. पत्रकार, संपादक वैगरे या कायद्यान्वये गुन्हेगार ठरतील.एवढा हा कायदा व्यापक आहे. हा कायदा मंत्र तंत्र विरोधी नसून परंतु माणसांचे जीव वाचवण्यासाठी आहे. जनतेने तर्कबुद्धीने विचार करावा, बुद्धीप्रामाण्यवादी बनावे, व विज्ञाननिष्ठ व्हावे हीच अपेक्षा.

अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा !

aaaa