करणी

ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील माणसांच्या मनात दहशत निर्माण करणारी अंधश्रद्धा म्हणजे करणी .करणी हा शब्द अगदी बालपणापासून प्रत्येकाने ऐकलेला आहे . प्रत्येक गावात करणी करणारी एकतरी \\\'कर्नाटकी \\\' स्त्री आहेच , हे लोकांच्या बोलण्यातून सतत जाणवतं . शाळा -कॉलेजमध्ये व्याख्यान झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी व्यक्त होतात , प्रश्न विचारतात, ग्रामीण भागातील नवनवीन अंधश्रद्धांची ओळख करुन देतात , तेव्हा बोलताना ठामपणे सांगतात की ,करणी हा प्रकार अस्तित्वात आहेच .आमच्या गावात एक स्त्री आहे , जी करणी करते.

काय असतो करणी हा प्रकार ?त्याचा व्यक्तीवर काय परिणाम होतो ? जगात खरंच करणी हा प्रकार अस्तित्वात आहे का ? करणीबाबत \\\' महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यात \\\' काय तरतूद आहे ?

करणी बाबत काही लोकांकडून माहिती मिळाली ती अशी . . .
ग्रामीण भागातील काही मुली म्हणाल्या , आमच्या घरी असं सांगितलं जातं की , आपले कपडे बाहेर वाळत टाकू नयेत, केसांचा गुंता बाहेर टाकू नये , रस्त्याने जाताना चौफेर लक्ष ठेवावं कारण आपल्या पायांखालची माती कुणी नेऊ नये . ( ग्रामीण भागातील रस्ते मातीचे असायचे ) कारण काय तर गावातील कर्नाटकी स्त्री  वस्त्र , केस घेऊन त्याची आपल्या नावाची काळया रंगाची बाहुली बनवते आणि आपल्यावर करणी करते. बरं करणी करणाऱ्या स्त्रीला करणी करण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याचीही गरज नसते . ती आहे तिथूनच एखाद्यावर करणी करू शकते . ज्याच्या नावाची बाहुली बनवलेली असते , त्या बाहुलीवर प्रयोग करून हवं ते उद्दिष्ट ही कर्नाटकी स्त्री साध्य करीत असते . समजा एखाद्या व्यक्तीचं पोट दुखत असेल , पोटात तीव्र कळा येत असतील तर , ग्रामीण भागात अशावेळी म्हटलं जातं की , हे बाहेरचे आहे . यावर डॉ . काहीच करू शकत नाही . अशा वेळी समजून घ्यावे कुणीतरी त्या व्यक्तीच्या नावाची बाहुली बनवली आहे कारण ह्या काळ्या बाहुलीच्या पोटात मांत्रिक किंवा कर्नाटकी स्त्री सुई खुपसते त्यामुळेच ह्या वेदनांना व्यक्तीला सामोरे जावे लागते . ह्या बाहुलीला जारण- मारणाची बाहुली म्हटल्या जाते . अशावेळी मांत्रिक वेगवेगळे उपाय सांगतो ,करणी कुणी केली हे देखील सांगतो . मी सांगेन त्याप्रमाणे केल्यास ही बाधा मी दूर करू शकतो असेही म्हणतो .करणी बाधित व्यक्तीला विशेषतःअमावस्या -पौर्णिमेला जास्त त्रास असेही सांगितले जाते . आज २१ व्या शतकात विज्ञान युगात वावरत असताना देखील करणीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कमतरता नाही.

लोक हा विचार करीत नाहीत की, अशा विद्यांमध्ये भारत पारंगत असता तर महासत्ता झाला असता किंवा भारताला लष्करावर फार खर्च करावा लागला नसता . भारतीय सैन्याला सीमेवर गस्त घालावी लागली नसती किंवा मोठमोठया अतिरेकी हल्त्यांमध्ये आपल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले नसते . या विद्येमध्ये पारंगत लोकांचा वापर करून आपण हवे ते साध्य केले असते . शत्रू राष्ट्रातील अधिकारी लोकांचे वस्त्र , केस ,नखे असे काही मिळवून त्यांच्या नावाच्या बाहुल्या बनवल्या असत्या आणि हवा तसा , हवा तेव्हा वापर केला असता . पण हे सर्व खोटे आहे . मंत्र तंत्राने काहीही साध्य होत नाही उलट माणूस मानसिकरित्या दुबळा बनतो.

महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हटल्या जातं कारण महाराष्ट्राला संतांचा वारसा आहे . संतांनी भोळ्या भाबडया जनतेला अशा अंधश्रद्धांमधून बाहेर काढण्याचा सतत प्रयत्न केला . संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगात सांगून गेलेत ," मंत्रचि वैरी मरे तर का बांधावी कट्यारे ?"

परंतु आज देखील उच्चशिक्षित लोक , विज्ञानाची पदवी घेतलेले लोक , शास्त्रज्ञ अशा मंत्र तंत्रांवर विश्वास ठेवतात . साध्वी प्रज्ञा सिंग जाहीरपणे वक्तव्य करते की , पक्षातील मोठ्या नेत्यांच्या मृत्यूला ( सुषमा स्वराज , अरुण जेटली वगैरे ) विपक्ष करीत असलेला जादूटोणा आहे . तेव्हा कीव येते .( आजची परिस्थिती पाहता या वक्तव्याचे आश्चर्य मुळीच वाटत नाही )

आज महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला आहे . अतिशय क्रांतिकारी असा हा कायदा आहे .एकूण १२ कलमांची अनुसूची आहे . गुन्हा घडल्यास कमीत कमी ६ महिने आणि जास्तीत जास्त ७ वर्षे तुरुंगवास आणि कमीत कमी ५ हजार व जास्तीत जास्त ५० हजार रू .दंडाचे प्रावधान आहे . या कायद्यानुसार एखाद्याने कोणताही विधी केला नाही केवळ \\\' ही व्यक्ती करणी करते \\\' असे म्हटले तरी गुन्हा ठरतो . संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे .जेव्हा एखादीला कर्नाटकी म्हणून घोषित केल्या जाते , तेव्हा तिला समाजाकडून खूप वाईट वागणूक दिली जाते . ( चेटकीण कुप्रथेविषयी अनेकांनी वाचलेले असेलच .) अनेकदा केवळ संशयापोटी एखाद्या स्त्रीची नग्न धिंड काढली जाते .एखादीचे संपूर्ण कुटुंबच ठेचून मारले जाते . संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असताना , कुठलाही दोष नसताना संपूर्ण कुटुंब नाहक त्रासाला , लोकांच्या रोषाला बळी पडते . म्हणूनच \\\' महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा \\\' घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे .घटनेच्या कलम 51 A ( H ) नुसार हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यदेखील आहे .आपली जागरूकता , आपली चिकित्सा , आपण स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टिकोन कुणा एकाचे प्राण वाचवत असेल तर , हे कार्य नक्कीच खूप मोठे आहे . चला तर या कार्यास आपण सारे हातभार लावू या !

 

aaaa